कोल्हापूर : आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ मध्ये खोटी माहिती व बनावट अथवा दिशाभूल करणारे रहिवासी पुरावे सादर करून काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने आयुक्त डॉ . राजेंद्र भारूड यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीय.
काही पालकांनी प्रवेश प्रक्रियेपूर्वी अवघ्या ३० ते ६० दिवस आधी आधारकार्ड व बँक पासबुकवरील पत्ते बदलल्याचे, तसेच काहींनी संशयास्पद भाडेकरारपत्रे सादर केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या रहिवासी पत्त्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच आरटीई प्रवेशात आर्थिक देवाणघेवाण, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका आणि व्यावसायिक ठिकाणांचे भाडेकरारपत्र रहिवासी पुरावा म्हणून वापरल्याच्या आरोप करण्यात आलीय. संपूर्ण प्रकरणासाठी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती स्थापन करून अपात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करावेत व त्या जागांवर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी करण्यात आलीय. योग्य चौकशी व कारवाई न झाल्यास उग्र जनआंदोलन छेडण्याचा तसेच कोल्हापूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी धिरज रोकडे, ओंकार जाधव उपस्थित होते.




