“पंतप्रधान नरेंद्र मोदींची ओळख जागतिक थापेबाज म्हणून झालीय”- खासदार संजय राऊतांचा घणाघात

जीडीपीच्या दाव्यावरून मोदी सरकारवर निशाणा; पुणे–कोल्हापूर रस्त्याच्या अवस्थेवरून फडणवीसांनाही टोला

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीडीपीबाबत केलेला दावा खोटा असून, त्यांची ओळख आता “जागतिक थापेबाज” अशी झाली आहे, असा घणाघाती आरोप ठाकरे सेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“मोदींनी आता देशाला खोटं ऐकण्याची सवय लावली आहे. जीडीपीबाबत पंतप्रधान परदेशात जाऊन माहिती देतात; मात्र देशात असताना पत्रकार परिषद घेऊन सविस्तर आकडेवारी आणि माहिती का देत नाहीत?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
देशातील परिस्थितीवर भाष्य करताना राऊत यांनी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “दोन वर्षांत साडेसात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. देशातील ८५ कोटी जनता सरकारकडून मिळणाऱ्या १० किलोच्या तुकड्यावर जीवन जगत आहे. कोट्यवधी बेरोजगार तरुण आत्महत्या करत आहेत. यावरून देशाची स्थिती काय आहे हे समजते,” असे ते म्हणाले.

पेपरफुटी, आंदोलनांमुळे देशाची होणारी बदनामी आणि रस्त्यांची दुरवस्था यावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. “रस्त्यात खड्डेच खड्डे असणे हेच जीडीपी वाढल्याचे लक्षण आहे का?” असा सवाल राऊत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर टीका करताना राऊत यांनी “मोदींचा जन्म आभासी आहे, ते विष्णूचे अवतार आहेत,” अशी उपरोधिक टीकाही केली.

पुणे–कोल्हापूर महामार्गावरून फडणवीसांना टोला….
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने देशात आणि राज्यात रस्त्यांचे जाळे विणल्याचा दावा करत असल्याचे सांगत राऊत यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला. “फडणवीसांनी एकदा पुणे–कोल्हापूर रस्त्यावरून प्रवास करावा, म्हणजे रस्त्यांची वास्तविक परिस्थिती त्यांना कळेल,” असा टोला त्यांनी लगावला.

“भाजपचा खेळ आता संपलाय”…
भाजपवर हल्लाबोल करताना “भाजपचा खेळ आता संपला आहे,” असा दावा राऊत यांनी केला. केंद्रातील चार वरिष्ठ मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याचा दावा करत त्यांनी “राजीनाम्याची सुरुवात अमित शहा यांच्यापासून करा,” अशी मागणी केल्याचे सांगितले. आरएसएसला मानणाऱ्या व्यक्तीला उपपंतप्रधान करण्याची मागणी होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांवरून निशाणा…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्ली दौऱ्यांवरही राऊत यांनी टीका केली. “त्यांच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीत आहेत. अमित शहा यांनीच राष्ट्रवादी पक्ष आणि शिंदे सेना स्थापन केली आहे, त्यामुळे त्यांना दिल्लीला जावे लागत आहे,” असा टोला त्यांनी लगावला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील भाजप नेतृत्वाशी असलेल्या संबंधांचा दाखला देत राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांना कधी वाजपेयी, प्रमोद महाजन किंवा आडवाणींना भेटण्यासाठी दिल्लीला जावे लागले नाही. ते बाळासाहेबांना भेटण्यासाठी मुंबईला यायचे. हा फरक आहे.”

“पैशाने माणसं विकली जातात”…
सध्याच्या राजकारणावरही राऊत यांनी भाष्य केले. “आजकाल पैशाने माणसे विकली जातात. पैशाने राजकारण फिरवले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. अजित पवार यांच्या मृत्यूचा संदर्भ देत राऊत यांनी त्याबाबतही प्रश्न उपस्थित केला. “अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याचा मृत्यू संशयास्पद होतो, एफआयआरदेखील होत नाही; मात्र इतरांवर काही मिनिटांत एफआयआर दाखल होतात. ही कसली राजनीती आहे?” असा सवाल त्यांनी केला.

पत्रकार परिषदेला ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर,नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, जिल्हाप्रमुख विराज पाटील, सुनील चौगुले, सुनील शिंत्रे, मनजीत माने आदी उपस्थित होते.

Scroll to Top