कोल्हापूर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत शारंगधर देशमुख – आदिल फरास यांनी ठोकले शड्डू

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत आज सत्ताधारी महायुती मधील शिंदे गटाचे शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादीचे आदिल फरास या गटनेत्यांमध्ये गटनेत्यांमध्ये जोरदार वाद झाला.प्रकरण थेट हमरातुमरी पर्यंत पोहोचले. एकमेकांना अर्वाच्च शिवीगाळ करत दोन्ही गट नेत्यांनी एकमेकांना ‘बघून घेण्याची’ भाषा केल्याने महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या उपस्थितीत आयुक्तांच्या सभागृहात दुपारी एक वाजता वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीला सुरुवात झाली. बैठकीला सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील गटनेते उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला रंकाळ्याशी संबंधित काही विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर जरगनगर परिसरातील प्रभाग क्रमांक १९ मधील नगरसेविका मानसी लोळगे यांनी रस्त्यांवरील झाडे आणि ड्रेनेजला बाधा निर्माण होत असल्याबाबत अधिकाऱ्यांकडे पत्र देऊन माहिती मागितल्याचा विषय चर्चेला आला. या विषयाला शिवसेना शिंदे गटाचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी विरोध केला.
या दोन्ही विषयांवरून दुपारी अडीचच्या सुमाराला आदिल फरास आणि शारंगधर देशमुख यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. वाद वाढत जाऊन दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आली. तसेच एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्याही देण्यात आल्या.

आयुक्त बैठकीतून उठून निघून गेले…..

बैठकीतील वाढता गोंधळ पाहून महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड हे बैठकीतून उठून बाहेर निघून गेले. गल्लीतील भांडणा सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे समजताच महापालिकेतील कर्मचारीही आयुक्तांच्या केबिनकडे धावले. दरम्यान, विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर आणि काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी दोन्ही नेत्यांमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.

महापालिका चौकात समर्थकांची गर्दी….
महापालिकेतील वादाची माहिती बाहेर पसरताच दोन्ही गटांच्या समर्थकांनी महापालिका चौकात मोठ्या संख्येने गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त मागवण्यात आला असून, पोलिसांकडून समर्थकांना परिसरातून बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, सत्ताधारी गटातील नेत्यांकडून दोन्ही बाजूंच्या समर्थकांना समजावून सांगण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महायुती मधीलच दोन गट नेत्यांमध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत झालेल्या या राड्यामुळे महायुती मधील नेत्यां मधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे

Scroll to Top