मुरगूड ग्रामीण रुग्णालयातील महा डायलेसिस केंद्राचे उद्घाटन...
कोल्हापूर - कागल तालुक्यातील मुरगूडमधील ग्रामीण रुग्णालयात महा डायलेसिस केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रांचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी, मुरगूड परिसरातील सुमारे ५० गावांसाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले. ग्रामीण रुग्णालयातील हेरिटेज इमारतीत तात्पुरता दवाखाना हलवून ५० खाटांच्या नवीन रुग्णालय इमारतीचे बांधकाम लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुरगूडमध्ये महान नेते असल्यामुळे मी कागल आणि गडहिंग्लजकडे अधिक लक्ष देत असून मुरगूडकडे दुर्लक्ष करतोय, अशी टीका माझ्यावर होते. मात्र माझे लक्ष मुरगूडकडे कायम राहणार असल्याचे नामदार मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी संजय मंडलिक यांनी, मुरगूड हे ५० गावांचे केंद्र असल्याने १०० बेडचे रुग्णालय आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, नगराध्यक्षा सुहासिनी पाटील, उपनगराध्यक्षा रेखा मांगले, मुख्याधिकारी अतिश वाळुंज, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रविंद्र कनाडे, दिलीप माने, सरिता थोरात, रणजित सूर्यवंशी, बी. एम. पाटील, सुनील सूर्यवंशी, रंगराव पाटील, देवानंद पाटील, रुपाली आंगज, नामदेवराव मेंडके, राजू आमते यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.