इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; गुरुवारी जिल्हाभर पेट्रोल पंपांवर आंदोलन

<h2>इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; गुरुवारी जिल्हाभर पेट्रोल पंपांवर आंदोलन</h2>

कोल्हापूर : पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांविरोधात कोल्हापूर काँग्रेस पक्षानेआक्रमक भूमिका घेतली असून गुरुवारी (दि. २१ मे) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमधील सुमारे ३०० पेट्रोल पंपांवर एकाच वेळी आंदोलन करण्यात येणार आहे.

 

या आंदोलनात विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील स्वतः एका पेट्रोल पंपावर आंदोलनात सहभागी होणार आहेत. तसेच आजी-माजी आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.

इंधन दरवाढीचा परिणाम केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवरही होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर डिझेल दरवाढ आणि इंधनटंचाईमुळे शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांवर परिणाम होत असल्याचेही पक्षाने म्हटले आहे.

आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांशी संवाद साधून दरवाढीमुळे होणाऱ्या आर्थिक फटक्याविषयी जनजागृती करणार आहेत. तसेच इंधन दरवाढीविरोधात सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी ऑनलाईन याचिका (ई-पेटिशन) भरण्याचे आवाहनही वाहनचालकांना करण्यात येणार आहे.