बिनापरवाना भारतात प्रवेश करणाऱ्या २ बांगलादेशींना ३ वर्ष ८ महिने सक्त कारावासाची शिक्षा

१९ जानेवारी २०२३ रोजी गांधीनगरमधील कोयना कॉलनी परिसरात एका भाड्याच्या घरावर दहशतवादविरोधी पथक, सोलापूर आणि गांधीनगर पोलिसांनी छापा टाकला होता. कारवाईत सोहेल कलाम मुल्ला उर्फ मोहंमद इनामुल फकीर आणि सुमैय्या बादशाह मुल्ला हे दोन आरोपी आढळून आले. त्यांच्याकडं भारतात प्रवेश करण्यासाठी आवश्यक पासपोर्ट अथवा अधिकृत कागदपत्रं नसल्याचं तपासात समोर आलं. तसंच, निर्धारित मार्ग व्यतिरिक्त घुसखोरीच्या मार्गानं भारतात प्रवेश करून गांधीनगरमध्ये वास्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ मधील कलम १४ (अ) आणि पारपत्र अधिनियम १९५० मधील कलम ६ अंतर्गत आरोपींवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात यांनी केला. खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक दोन, आर. व्ही. उत्पात यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. प्रतिभा जे. जाधव यांनी काम पाहिलं. त्यांनी न्यायालयात आठ साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष, प्रत्यक्ष पुरावे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयानं दोन्ही आरोपींना दोषी ठरवलं. दोघेही बांगलादेशचे नागरिक असून, भारतात येण्यासाठी पासपोर्ट किंवा अधिकृत प्रवास कागदपत्रांचा वापर न करता अनधिकृत मार्गानं प्रवेश केल्याचं तपासात निष्पन्न झालं. न्यायालयानं सोहेल कलाम मुल्ला उर्फ मोहंमद इनामुल फकीर आणि सुमैय्या बादशाह मुल्ला यांना तीन वर्षे आठ महिन्यांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तसंच प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अशी माहिती अॅड. प्रतिभा जाधव यांनी दिली.

सरकार पक्षातर्फे अॅड. प्रतिभा जाधव यांनी काम पाहिलं. पैरवी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल एफ. आय. पिरजादे आणि पी. आर. पाटील यांनी या खटल्यात मदत केली.

Scroll to Top