कोल्हापूर – शहराला पाणीपुरवठा करणारी धरणं , तलाव आणि नद्यांमधील जलसाठा कमी झाल्यानं काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सध्या जिल्ह्यासह शहर परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यानं धरणांमध्ये आणि जलस्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झालाय. असं असताना शहरात अद्यापही एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्यानं नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय . घरगुती वापर, व्यापारी आस्थापना आणि दैनंदिन जीवनावर या निर्णयाचा परिणाम होतोय . त्यामुळं शहरातील उपलब्ध जलसाठ्याचा तातडीनं आढावा घेऊन एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा आदेश रद्द करावा आणि संपूर्ण शहरात पूर्ववत दररोज नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह शिष्टमंडळानं निवेदनाद्वारे केलीय. मागणीचं निवेदन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांना देण्यात आलं.. दरम्यान, डॉक्टर भारुड यांनी पाणीपुरवठा दररोज सुरळीत सुरु करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे आणि विनायक फाळके उपस्थित होते.
कोल्हापूर शहरात पूर्ववत दररोज पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी

