कोल्हापूर महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमांना राज्य शासनाची मंजुरी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या “सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२५” यांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. नगर विकास विभागाने ६ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला असून, महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच स्वतंत्र सेवा प्रवेश नियमांना अधिकृत मान्यता मिळाली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वाढत्या नागरीकरण, वाढती लोकसंख्या तसेच विविध विकास प्रकल्प आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन हे नियम तयार करण्यात आले आहेत. यापूर्वी शासनाने महापालिकेच्या ४,४४५ पदांच्या आकृतिबंधास मंजुरी दिली होती. त्यानंतर सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण याबाबतची नियमावली तयार करून ती शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती.

महासभेने ९ जानेवारी २०२५ रोजी या नियमांना मान्यता दिल्यानंतर शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ४५४, ४५५, ४५६, ४५७(३) आणि ४६५ अंतर्गत अंतिम मंजुरी दिली आहे. या नियमांमुळे महापालिकेतील विविध पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, भरतीची पद्धत, सेवांचे वर्गीकरण, पदोन्नतीची प्रक्रिया आणि सेवा अटी अधिक स्पष्ट व पारदर्शक होणार आहेत. त्यामुळे भविष्यातील भरती प्रक्रिया अधिक सुसूत्र आणि नियमबद्ध पद्धतीने राबविण्यास मदत होणार आहे.शासनाने स्पष्ट केले आहे की, हे नियम शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून लागू होतील.

Scroll to Top