प्रशासकीय

कोल्हापूर महापालिकेच्या आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांच्या जात प्रमाणपत्रांबाबत चर्चा; प्रशासनाच्या तपासणीकडे लक्ष

pnigave अपडेट: 28 November 2026, 7:54 PM 2 मिनिटे वाचन
शेअर करा

आरक्षणातून नोकरी, प्रमाणपत्रांचा मात्र पत्ता नाही?

कोल्हापूर : सरकारी नोकरी मिळवताना आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर आवश्यक जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र, कोल्हापूर महापालिकेच्या आस्थापना विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, १० ते १५ वर्षांपासून सेवेत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी अद्याप आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

आरक्षित प्रवर्गातून नियुक्ती मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार निर्धारित मुदतीत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित आहे. त्यासाठी नियुक्तीच्या वेळीच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. मात्र, इतकी वर्षे उलटूनही काही कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पूर्तता झाली नसेल, तर संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याशिवाय आरक्षणातून नियुक्ती मिळविल्यानंतर पदोन्नतीच्या वेळी खुल्या प्रवर्गातून पदोन्नती घेतली जात असल्याची देखील चर्चा आहे. यामध्ये नेमके किती कर्मचारी आहेत, त्यांची नियुक्ती कोणत्या प्रवर्गातून झाली आणि पदोन्नती कोणत्या नियमांनुसार देण्यात आली, याची माहिती समोर येणे आवश्यक आहे.

महापालिकेच्या आस्थापना विभागाकडे सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकांची आणि नियुक्तीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती उपलब्ध असणे अपेक्षित आहे. त्यामुळे आरक्षित प्रवर्गातून नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जात प्रमाणपत्रांची व वैधता प्रमाणपत्रांची विशेष तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

महापालिका आयुक्त या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणार का? तसेच प्रमाणपत्रे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये नियमानुसार काय कारवाई करणार, हे आता पहावं लागेल.

संबंधित विषय

Scroll to Top