कोल्हापूर – २६ नोव्हेंबर संविधान दिन तसेच राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधत इंडिया आघाडीवतीने राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाजवळ संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करत संविधान आणि सहकार वाचवण्याची शपथ घेण्यात आली.
प्राचार्य टी. एस. पाटील यांनी उपस्थितांना संविधान बचावची शपथ दिली. यावेळी संविधान वाचले पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, सहकार वाचला पाहिजे आणि गोकुळचे संरक्षण झाले पाहिजे, असा संदेश देण्यात आला. बहुमत नसताना अध्यादेश काढत गोकुळचे अध्यक्षपद मिळवण्याच्या सरकारच्या कृती विरोधात राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. कोल्हापुरात ९ नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या भव्य मोर्चातून जनतेने आपली लोकशाहीवरील निष्ठा दाखवून दिली होती. याच लढ्याचा पुढचा टप्पा म्हणून आज संविधान दिनी संविधान, लोकशाही, सहकार आणि गोकुळ वाचवण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली.
यावेळी ‘सहकार वाचवा, देश वाचवा, संविधान वाचवा, देश वाचवा… सहकारामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या सरकारचा निषेध असो,’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी गोकुळच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत गोकुळसाठी सहकार कायद्यात केलेला बदल रद्द होईपर्यंत संघर्ष सुरुच राहिल, असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी कॉम्रेड उदय नारकर, दिलीप पोवार, वसंत भोसले, मेधा पानसरे, चंद्रकांत यादव, रघुनाथ कांबळे, भारती पोवार, शिक्षक नेते भरत रसाळे, सुभाष देसाई, प्रवीण पाटील, वसंत पाटील, रवी जाधव, अनिल लवेकर, शिवाजी परुळेकर, एन. एन. पाटील, वसंत लिंगनूरकर, सी. आर. गोडसे, दिलदार मुजावर, संभाजी जगदाळे, तानाजी लांडगे यांच्यासह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.




