सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्देश
नवी दिल्ली – देशात सर्वत्र पॅकेज्ड खाद्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. परंतु या पॅकेज्ड खाद्यपदार्थांमध्ये साखर, मीठ आणि चरबीचे प्रमाण कमी – जास्त असते. यासाठी आरोग्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने, पॅकेज्ड खाद्यपदार्थांमध्ये साखर, मीठ आणि चरबीचे प्रमाण जास्त असल्यास पाकिटाच्या दर्शनी भागावर प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र लाल रंगाचे षटकोनी चेतावणी चिन्ह लावणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता देशातील सर्व पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर चेतावणी चिन्ह दिसणार आहे.
आरोग्याचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाला असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
यामुळे इथून पुढे प्रत्येक षटकोनात संबंधित घटकाचे चित्र आणि त्यासोबत ‘HIGH SUGAR’, ‘HIGH SALT’ किंवा ‘HIGH FAT’ असा ठळक मजकूर दिसणार आहे. तसेच, पदार्थातील केवळ वरून घातलेली साखर न मोजता एकूण साखरेचे प्रमाण विचारात घेऊन नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.




