कोल्हापूर – शहरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. शिवाय मधुमेहाच्या रुग्णाला चुकीचे सलाईन दिल्याचा गंभीर आरोप करत आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक सुनील कानुरकर यांच्यासह शिष्टमंडळाने राजर्षी शाहू शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांची भेट घेतली.
यावेळी सीपीआरमध्ये रुग्णांना उपचार देताना दिरंगाई केली जाते. रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या उद्धट वागणुकीमुळे रुग्ण आणि नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार डॉ. भिसे यांच्याकडे करण्यात आली. रुग्णाबाबत काही विचारणा केली तर डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ एकमेकांकडे बोट करून जबाबदारी झटकतात, असा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे कामात दिरंगाई करणाऱ्या आणि रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या डॉक्टर आणि इतर स्टाफवर कारवाई करा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सुनील नेसरीकर, महावीर केसरकर, निलेश खुराडे, श्रीधर ढेरे, मानस माने, विष्णू माळकर आदी उपस्थित होते.




