कोल्हापूर – सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात आता आणखी दोन महत्त्वाच्या सुविधा सुरू होणार आहेत. रुग्णालयात आयव्हीएफ सेंटर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटची सुविधा उभारण्यात आली असून, या सुविधांचे लोकार्पण महिना अखेरीला होणार आहे. या सुविधांमुळे वंध्यत्वाच्या समस्येवर उपचार घेणाऱ्या दाम्पत्यांना आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सीपीआरमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांचा ओघ वाढत आहे. नियमित बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या दोन हजारांच्या पुढं गेलीय. अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना होत असल्याचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी सांगितले.
भविष्यात प्रोटॉन थेरपीसारखी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजनही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेंडा पार्क मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठीच्या बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस आणि कॅरम हॉल या सुविधांचंही महिनाअखेरीला लोकार्पण होणार असल्याचे डॉ. भिसे यांनी सांगितले.
यावेळी उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, डॉ. किशोर देवरे, डॉ. अक्षय बाफना, समाजसेवा अधीक्षक शशिकांत राऊळ आणि महेंद्र चव्हाण उपस्थित होते.




