कोल्हापूर – करवीर तालुक्यातील हलसवडे गावातील गजानन गडवेकर याची राधानगरी तालुक्यातील एका गावातल्या मुलीशी ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत गजानन याने तिचा पाठलाग करून त्रास दिला, पीडितेने विरोध दर्शवल्यानंतरही संशयिताने तिला धमकावल्याची तक्रार राधानगरी पोलीसांत दाखल आहे. या तक्रारीत नमूद केल्यानुसार २० सप्टेंबरला सकाळी राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथल्या माळावर पीडित मुलीला मारून टाकण्याची धमकी देत जबरदस्तीने तिला चारचाकीत बसवून नेत तिचा विनयभंग करत तिचे फोटो काढले. १७ नोव्हेंबरला तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. पीडीतेने केलेल्या तक्रारीनंतर राधानगरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ७८, ७९, ३५१(३) तसंच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ मधील कलम ४, ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अजित सिद, उपनिरीक्षक प्रणाली पवार, निवृत्ती खोत यांच्यासह राधानगरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.




