इतर

पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी गुड न्यूज..!

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

मैदानी सरावासाठी महापालिका, नगरपरिषदांची मैदाने मिळणार मोफत

मुंबई – पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बल, चालक, वाहक, पोलीस अधिकारी तसेच शारीरिक चाचणी अनिवार्य असलेल्या विविध संवर्गातील भरतीसाठी मैदानी सराव महत्त्वाचा असतो. मात्र, अनेक ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना सरावासाठी योग्य मैदान उपलब्ध होत नाही. खासगी प्रशिक्षण संस्थांवर त्यांना अवाजवी खर्च करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन राज्याच्या नगरविकास विभागाने आज महत्त्वाचे परिपत्रक काढले आहे.

त्यानुसार राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींनी त्यांच्या मालकीची अथवा व्यवस्थापनाखालील मैदाने, क्रीडांगणे आणि धावपट्ट्या भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी सराव करणाऱ्या उमेदवारांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यासाठी उमेदवारांकडून कोणते ही भाडे, वापर शुल्क, प्रवेश शुल्क, अनामत रक्कम अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारता येणार नाही. भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून संबंधित संवर्गाची मैदानी चाचणी होईपर्यंत सरावासाठी ही परवानगी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  पहाटे पाच ते सकाळी नऊ किंवा सायंकाळी चार ते रात्री आठ ही सरावासाठी प्राधान्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र त्या जागेवर व्यावसायिक अथवा खासगी प्रशिक्षण वर्ग भरवता येणार नाहीत, सरावावेळी स्वच्छता, आवाज नियंत्रण, वाहतूक आणि सुरक्षा याबाबतचे नियम काटेकोरपणे पाळाव्यात, सरावाच्या ठिकाणी कोणताही राजकीय, धार्मिक किंवा वादग्रस्त कार्यक्रम करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top