कोल्हापूर – सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरीसाठी नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली आहे. कोल्हापूर केंद्रावर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे १६ नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
दररोज सायंकाळी ७ वाजता नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या नाट्यरसिकांना दिवाळीनंतर नाट्यप्रयोगांची मेजवानी अनुभवता येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
कोल्हापूरसहित जयसिंगपूर, इचलकरंजी, वारणानगर, यळगुळ, चंदगड, काळम्मावाडी, गडहिंग्लज, आजरा आदी भागांतील एकूण २१ नाट्यसंस्था या केंद्रावरील प्राथमिक फेरीत सहभागी होणार आहेत.
यंदाच्या स्पर्धेत विविध विषयांवरील नाटके सादर होणार असल्याने प्रेक्षकांना वेगवेगळ्या आशयांचे आणि नाट्यशैलींचे दर्शन घडणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी नाट्यसंस्थांमध्ये कलात्मक चुरस पहायला मिळणार असून, कलाकारांच्या मेहनतीचा आणि सर्जनशीलतेचा अनुभव नाट्यरसिकांना घेता येणार आहे. या स्पर्धेतील नाट्यप्रयोगांना नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.




