इचलकरंजी – शहरालगत असलेल्या कबनूर गावात मराठी शाळेजवळ राहणाऱ्या अंशू अनिल कांबळे या चार वर्षांच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला आहे. तो घरात जेवत असताना अचानक कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्या चेहऱ्यावर आणि तोंडावर गंभीर चावा घेतला. या प्रकारामुळे घरात एकच गोंधळ उडाला.
आई-वडिलांनी तातडीने धाव घेत कुत्र्याच्या तावडीतून अंशूची सुटका केली. मात्र कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महिन्यातील कुत्र्यांच्या हल्ल्याची ही चौथी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांवर कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इचलकरंजी शहरासह कबनूर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आणखी एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होवू लागली आहे.




