आंदोलन

रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी रंकाळा संवर्धन संरक्षण समितीचे रास्ता रोको आंदोलन…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – शहराच्या ऐतिहासिक रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखावे, तलावाचे जतन आणि संवर्धन करा, अशा मागण्या करत रंकाळा संवर्धन संरक्षण समिती आणि रंकाळा प्रेमींच्यावतीने आज सकाळी अकरा वाजता रंकाळा टॉवर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी ‘रंकाळा वाचवू या’ अशा संदेशाच्या पांढऱ्या टोप्या परिधान केल्या होत्या. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. रास्ता रोको केल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यातून बाजूला करून रस्ता मोकळा करून दिला. आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी तातडीने रोखावे, संध्यामठ आणि टॉवरच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे, तसेच रंकाळ्याच्या संवर्धनासाठी विशेष महासभा बोलवावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी महापालिकेचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहिला नसल्याचा आरोप करत महापालिकेला घेराव घालून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

शाम सोसायटी आणि परताळा परिसरातून येणारे सांडपाणी रंकाळ्यात मिसळत असल्याचा आरोप करत ते तातडीने रोखण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, महापालिकेचे उपआयुक्त नागेंद्र मुतगेकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. रंकाळा तलाव स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी दिलीप देसाई, वसंत मुळीक, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, संजय मांगलेकर, प्रसाद देसाई, अशोक देसाई यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि रंकाळा प्रेमी उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top