कोल्हापूर – यंदा साखरेला चांगला भाव आहे, त्यामुळे उसाला किमान चार हजार पाचशे रुपये एफ आर पी मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत कारखानदारांकडून दर जाहीर होत नाहीत, तोपर्यंत साखर कारखाने चालू करू नयेत, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील सोमवारी सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी आपला ऊस पुरवठा कारखान्यांना पाठवू नये, असे आवाहन केले. शेतकरी संघटनेची मागणी मान्य नाही झाली तर येणारी दिवाळी कोणालाच चांगली करू देणारी नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील, पन्हाळा तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील, हातकणंगले तालुकाध्यक्ष सुधीर मगदूम,भानुदास पाटील, अमर पाटील यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.




