गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोल्हापूरच्या राजकारणात जोरदार हालचाली सुरू
कोल्हापूर – गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोल्हापूरच्या राजकारणात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. सहलीसाठी गोव्याला गेलेल्या गोकुळच्या संचालकांची भेट घेण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके आणि माजी खासदार संजय मंडलिक हे महायुतीचे नेते विशेष विमानाने गोव्याला पोहोचले. संचालकांशी चर्चा केल्यानंतर हे नेते कोल्हापुरात परतले. या भेटीत नेमकी कोणती रणनीती ठरली आणि अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेबाबत संचालकांना कोणत्या सूचना देण्यात आल्या, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागा जिंकल्या. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांचा कोरम आवश्यक असल्याने निवडीवेळी तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या संचालकांनी बैठकीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्यास अध्यक्ष निवडीचा तिढा कायम राहू शकतो. त्यामुळे महायुतीचे संचालक अध्यक्ष निवडीच्या बैठकीला उपस्थित राहणार की अनुपस्थित राहणार, यावर अध्यक्षपदाचा निर्णय अवलंबून राहण्याची शक्यता आहे. गोकुळमधील सत्तासंघर्ष आणि आगामी केडीसीसी बँकेची निवडणूक या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीमध्ये महायुतीच्या नेत्यांकडून दूध उत्पादकांचा कौल मान्य करुन पुढे जाण्याचा निर्णय घेतला जाणार की अध्यक्षपदासाठी महायुतीकडून नवे डाव टाकले जाणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




