Blog

गोकुळचा कौल मान्य करा, अन्यथा केडीसीसीत जनतेच्या रोषाला सामोरं जा; कोल्हापुरात प्रतिक्रिया…!

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेकडे कोल्हापूरचं लक्ष; गोकुळच्या सत्तासंघर्षाचे पडसाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमटण्याची चर्चा…

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकारण सध्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीभोवती फिरत असताना, या संघर्षाचे पडसाद आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीतही उमटण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गोकुळमध्ये सभासदांनी दिलेला लोकशाहीचा कौल मान्य करून अध्यक्ष निवडीचा मार्ग सुकर करण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकार्य करावे, अन्यथा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही सभासदांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते, अशी चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.

गोकुळच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेल्या १४ संचालकांच्या कोरममुळे निवड प्रक्रियेपुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे महायुतीचे संचालक अध्यक्ष निवडीच्या बैठकीला उपस्थित राहणार की अनुपस्थित राहून निवड प्रक्रियेत अडथळा निर्माण करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी विशेष विमानाने गोव्याला जाऊन सहलीवर असलेल्या गोकुळच्या संचालकांची भेट घेतली. या भेटीनंतर नेते कोल्हापुरात परतल्याने गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. या बैठकीत संचालकांना नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आल्या आणि अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याबाबत काय निर्णय झाला, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

गोकुळमधील सत्तासंघर्षाकडे केवळ अध्यक्षपदाच्या निवडीपुरते पाहिले जात नसून, आगामी केडीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनेही त्याचे राजकीय महत्त्व असल्याचे मानले जात आहे. गोकुळमध्ये सभासदांनी दिलेला कौल स्वीकारून अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा केल्यास सहकार क्षेत्रातील नाराजी कमी करण्यास मदत होऊ शकते, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.

दुसरीकडे, गोकुळमधील सत्तासंघर्ष अधिक चिघळल्यास त्याचा परिणाम जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्ष निवडीत मुश्रीफ कोणती भूमिका घेतात, याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा बँकेतील राजकीय समतोल राखण्यासाठी गोकुळच्या निवड प्रक्रियेत सहकार्याची भूमिका घेतली जाणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

गोकुळच्या निवडणुकीतून व्यक्त झालेली सभासदांची नाराजी आणि अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेला पेच यांचा आगामी सहकार क्षेत्रातील राजकारणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुश्रीफ यांच्यासमोर गोकुळमधील राजकीय भूमिका आणि जिल्हा बँकेतील भविष्यातील समीकरणे यांचा समतोल साधण्याचे आव्हान असल्याची चर्चा आहे.गोकुळमध्ये लोकशाहीच्या कौलानुसार अध्यक्ष निवडीचा मार्ग सुकर होणार की सत्तासंघर्ष कायम राहणार, यावर पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असतील.

गोकुळमधील निर्णयाचा परिणाम केडीसीसीच्या राजकारणावर होणार का आणि मंत्री मुश्रीफ सहकार क्षेत्रातील संभाव्य नाराजी कशी हाताळणार, याकडे आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top