पुणे – सध्या राज्यात पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी होत आहे. ही मतमोजणी थोडी गुंतागुंतीची असते. त्यामुळे सर्वसामान्यांना ही मतमोजणी समजायला अवघड जाते. याच बरोबर या निवडणुकीत मतदान करण्याची प्रक्रियाही थोडी वेगळी असते त्यामुळे अनेक मतदारांकडून खूप चुका होतात. यामुळे त्या मतदारांचे मत बाद होण्याची शक्यता खूप जास्त असते.
पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांना EVM चा वापर न करता आपला पसंती क्रमांक नोंदवावा लागतो. तसेच कोणत्या चुका केल्यास आपले मत बाद होवू शकत हे पुढे जाणून घेवूया..
१ मतदारांना पसंतीक्रम नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने एक खास पेन (जांभळ्या शाईचे स्केच पेन) दिला जातो. तोच वापरावा लागतो. अधिकृत पेनव्यतिरिक्त स्वतःचे बॉलपेन, जेलपेन किंवा पेन्सिल वापरल्यास मत तातडीने बाद केले जाते.
२. मतपत्रिकेवर किमान ‘१’ (पहिली पसंती) हा अंक लिहिणे अनिवार्य आहे. तो न लिहिता थेट २, ३ किंवा ४ लिहिल्यास मत बाद होते जर ‘१’ हा अंक दोन वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावापुढे लिहिला, तरीही मत बाद होते.
३. पसंतीक्रम हा फक्त आंतरराष्ट्रीय अंकात (1, 2, 3…) किंवा मराठी/देवनागरी अंकात (१, २, ३…) किंवा रोमन अंकात (I, II, III…) देणे आवश्यक आहे जर मतदाराने अंकांऐवजी अक्षरात म्हणजे ‘एक’, ‘दोन’, ‘तीन’ किंवा ‘One’, ‘Two’ असे लिहिले, तर मत ग्राह्य धरले जात नाही.
४. सामान्य निवडणुकीसारखा उमेदवाराच्या नावापुढे टिक मार्क (✔️) करणे, फुली मारणे (✖️) किंवा अंगठ्याचा ठसा उमटवणे यामुळे मत बाद होते.
५. मतपत्रिकेवर स्वतःची सही करणे, नाव लिहिणे, अंगठ्याचा ठसा उमटवणे किंवा कोणताही मजकूर लिहिल्यास मतदाराची ओळख उघड होते. अशा मतपत्रिका गंभीर चूक मानून बाद केल्या जातात.
६. जर एखाद्या उमेदवाराच्या नावापुढे ‘१’ आणि ‘२’ हे दोन्ही आकडे लिहिले, तर निवडणूक अधिकारी गोंधळात पडतात आणि ते मत बाद ठरवले जाते.
७. पसंतीक्रमाचा अंक उमेदवाराच्या नावापुढील ठरवून दिलेल्या चौकटीतच (Box) लिहावा लागतो. जर अंक दोन उमेदवारांच्या नावाच्या अगदी मध्ये लिहिला, ज्यामुळे तो नक्की कोणाचा आहे हे समजत नसेल, तर मत बाद होते.




