कोल्हापूर – राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने मराठीतील ख्यातनाम कथाकार शंकर खंडू पाटील यांची जन्मशताब्दी साजरी केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्यावतीने येत्या १४ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये कथाकार शंकर खंडू पाटील यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम होणार आहे.
शंकर खंडू पाटील यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९२५ रोजी पेठ येथे झाला. वास्तव्य बराच काळ कोल्हापूरात होते. कथा, कादंबरी, चित्रपट कथा-पटकथा याबरोबरच राजकीय, सामाजिक विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले. चोरा मी वंदिले, सागराचे पाणी, सवाल, बाजिंदा हे त्यांचे चार कथासंग्रह आणि सरपंच, इशारा, घुंगरू, कुलवती, बेईमान, ललाटरेषा, सून माझी सावित्री या सात कादंब-या प्रकाशित आहेत. कौल दे खंडेराया आणि सून माझी सावित्री हे चित्रपट त्यांच्या साहित्यकृतींवर निघाले. भल्या घरची मी कामिनी हे लोकनाट्य आणि सून मोठी भाग्याची हे त्यांचे नाटकही गाजले.
शंकर खंडू पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करण्याबाबत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे माजी अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार साहित्य सभेचे अध्यक्ष डॉ. विनोद कांबळे, कार्याध्यक्ष दि. बा. पाटील, भीमराव धुळुबुळू आदींनी त्याचा पाठपुरावा केला आणि सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी याबाबत निर्णय जाहीर केला आहे.




