ब्रेकिंग न्यूज
धार्मिक

घटस्थापनेने जोतिबा डोंगरावर पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सवाला प्रारंभ…

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर –  दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा देवाच्या नवरात्रोत्सवाला आजपासून मोठ्या धार्मिक आणि पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला. जोतिबा मंदिरात पहाटे ३ वाजता महाघंटेचा नाद करुन दरवाजे उघडण्यात आले. पहाटे ४ ते ५ जोतिबा मूर्तीची पाद्य पुजा, मुख मार्जन, काकड आरती झाली. त्यानंतर पहाटे ५ ते ६ पंचामृत महाभिषेक विधी झाला. ६ वाजता घटस्थापने निमित्त जोतिबा देवाची नागवल्ली पानातील अलंकारी बैठी महापुजा बांधण्यात आली. या पूजेसाठी चिकोडी तालुक्यातील खडकलाट गावातील भाविकांनी नागवल्ली पाने पुरवली. ही पूजा समस्त गावकरांनी बांधली. सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापनेसाठी श्रीचे पुजारी, उंट, घोडे, देव सेवक, वाजंत्री यांच्या लवाजम्यासह धुपारती सोहळा निघाला. धुपारती सोहळा मार्गावर ग्रामस्थांनी रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या.  यावेळी महिलांनी धुपारतीचे स्वागत करून औक्षण केले.

या धुपारती सोहळ्यात जोतिबा देवाचे व्यवस्थापक, गावकर, पुजारी, ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते. धुपारती सोहळ्याने जोतिबा, काळभैरव, महादेव मंदीर, चोपडाई देवी, यामईसह इतर सर्व मंदिरात घट बसवण्यात आले. यावेळी आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. आज नवरात्र उत्सवामुळे जोतिबा मंदीरात घटस्थापना करण्यात आली. यावेळी जोतिबाची नागावल्ली पानात सरदारी रूपात बैठीपूजा बांधण्यात आली उद्यापासून कमळपूष्पात पूजा बांधण्यात येते, १७ ऑक्टोबरला जोतिबाचा जागर असून २० ऑक्टोबरला दसऱ्यादिवशी नवरात्रोत्सवाची सांगता होणार असल्याचे जोतिबाच्या पुजाऱ्यांनी सांगितले. आज घटस्थापना आणि रविवार असल्यामुळे पहिल्या माळेला जोतिबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

संबंधित विषय

Scroll to Top