कोल्हापूर – कुस्तीचा हंगाम चालू झालाय, मात्र खासबाग मैदानाचा दुष्काळ काही हटेना. या मैदानात सध्या कमरेएवढं गवत, आणि तणकट वाढल्याने य ठिकाणी मल्लांना सराव करता येत नाही. त्यामुळे सामाजिक भान जोपासत आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समिती, आणि राष्ट्रीय तालीम संघाच्यावतीने गंगावेश तालीम तसेच मोतीबाग तालमीच्या मल्लांनी पुढाकार घेतला. जवळपास अडीचशे मल्लांनी आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर पहाटे आखाड्यातील आणि मैदान परिसरातील गवत, तणकट काढून स्वच्छता केली. हवेली इमारतीच्या प्रवेशद्वारावर दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, सिगरेटची रिकामे पाकिटे, माव्याचे कागद असा सात ते आठ पोती कचरा संकलित करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थळी पडले. यानंतर पुनर्बाधकामासाठी पंचवीस कोटींचा निधी प्राप्त झाला. मात्र सभागृहाचे काही काम आणि मैदानाच्या व्यासपीठाचे काम झालेले नाही. सभागृहाचे उद्घाटन झाले, तरीदेखील ही अवस्था आहे. मग लोकप्रतिनिधी काय झोपलेले आहेत का ? असा सवाल या विविध संघटनांनी उपस्थित केला. या लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी येत्या आठ दिवसात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर निदर्शने करण्याचा इशारा कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे यांनी दिलाय. आज सर्व मल्लांनी हाताच्या साहाय्याने मैदान साफ केलंय, मात्र हे गवत आणि तणकाट मुळापासून काढण्यासाठी मशनरीची गरज आहे. हे काम महापालिका प्रशासनाने लवकर करावे, अशी मागणी करण्यात आलीय. या स्वच्छता मोहिमेत वस्ताद विश्वास हारुगले, महाराष्ट्र केसरी वस्ताद विष्णू जोशीलकर, कुस्ती प्रशिक्षक चंद्रकांत चव्हाण, महेश वरुटे, कालीचरण सोलंकर, कुमार पाटील, सदबा भिंगुर्डे, बापू मेंढे, हरिश्चंद्र पुजारी, सुरज हवलदार आदींसह कार्यकर्ते, कुस्तीगीर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




