नवी दिल्ली – भारत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात दोन सहआयुक्तांनीच तक्रारीचा सूर आळवल्यामुळे देशभरातील विरोधी पक्षांकडून ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत ज्ञानेशकुमार यांची कार्यपध्दती, एसआयआर प्रक्रियेतील त्रुटी या विरोधात देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाजूर्न खर्गे यांनी पत्रकार बैठकीत या निर्णयाची माहिती दिली.
पत्रकार बैठकीत ठरल्यानुसार दोन ते आठ ऑक्टोबर या कालावधीत देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर लोकशाही वाचवा पदयात्रा काढत निदर्शने करण्यात येणार आहे. सहा ऑक्टोबरला विरोधी पक्षांचे सर्व खासदार आणि नेते यांच्या सहभागातून निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातील सर्व विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना देशातील घटनात्मक संस्थांवर कसा ताबा मिळवला जातोय, याची माहिती देणार आहे. निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभारासह देशातील लोकशाही विरोधी कारभारा विरोधातील आंदोलानाचा भाग म्हणून चौथ्या टप्प्यात देशातील पाच प्रमुख शहरांमध्ये सभा घेण्यात येणार आहे. त्यानंतर एक नोव्हेंबरला दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहे. या पत्रकार बैठकीत पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, ज्ञानेशकुमार चोर आणि दरोडेखोर आहेत असा घणाघात केला.
या पत्रकार बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, जम्मु काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, खासदार सुप्रिया सुळे, अभिषेक बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित होते.




