दुष्काळी यादीतून पाच तालुके वगळल्याने शेतकरी आक्रमक; करपलेले सोयाबीन, भात पीक घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर शासनाने अन्याय केल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शाहूवाडी, हातकणंगले, कागल, शिरोळ आणि करवीर या पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करावा, या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात करपलेले सोयाबीन व भात पीक प्रत्यक्ष निवेदनासोबत सादर केले.

या पाचही तालुक्यांमध्ये चालू वर्षी अत्यल्प व कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भूजल पातळी खालावली असून अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कागदोपत्री आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती गंभीर असूनही या तालुक्यांना दुष्काळी यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

शासनाकडून ‘ट्रिगर-१’ अंतर्गत दुष्काळी तालुके जाहीर करताना संपूर्ण तालुका हा घटक मानला जातो. मात्र, तालुकानिहाय निर्णयाऐवजी महसूल मंडळनिहाय आणि गावनिहाय प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. ज्या गावांमध्ये पावसाचा खंड २५ दिवसांपेक्षा अधिक राहिला असून उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे, अशा सर्व बाधित गावांचा दुष्काळी यादीत समावेश करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून महसूल विभागामार्फत वस्तुनिष्ठ पाहणी, नजरअंदाज व अंतिम पैसेवारी करून शासनाकडे तातडीने शिफारस करावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पोवार, धनाजी पाटील, डॉ. बाळासाहेब पाटील, बाजीराव पाटील, विशाल चौगुले, अरुण मगदूम, पुरंदर पाटील, विक्रम पाटील, सौरभ शेट्टी, राजगोडा पाटील, सुरेश म्हाऊंटकर, राजू वडाम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Scroll to Top