गोकुळ निवडणुकीत २५ जागा स्वबळावर लढवणार – आ. सतेज पाटील

कोल्हापूर – गोकुळचा कारभार राजकारणविरहित असावा, दूध उत्पादक हाच गोकुळचा खरा मालक आहे आणि शेतकरी-दूध उत्पादकांचे राजर्षी शाहू शेतकरी समविचारी पॅनेल उभे करून २५ जागा स्वबळावर लढवणार असल्याची भूमिका आमदार सतेज पाटील यांनी घेतली आहे. चंदगड तालुक्यातील शेतकरी, दूध उत्पादक आणि ठरावधारकांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या. यावेळी ते बोलत होते.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय भेटीगाठींना वेग आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन मतदारांसह सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी आमदार सतेज पाटील घेत आहेत. आ. सतेज पाटील चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चंदगड तालुक्यातील हेरे गावच्या महादेव प्रसादे यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर चंदगड काँग्रेस कमिटी कार्यालयात दूध संस्था प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी लक्ष्मण गावडे तसेच भाजपाचे आमदार शिवाजी पाटील यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली.
या दरम्यान अडकूरच्या अभय देसाई, बबन देसाई, बेळेभाटच्या नितिन पाटील, शांताराम पाटील, दयानंद काणेकर , शिवाजी सावंत, माजी आमदार भरमू अण्णा पाटील, शामराव बेनके, मोहन परब, शिनोळीचे प्रभाकर खांडेकर, कल्लापण्णा भोगम, जिल्हा परिषद सदस्य मानसी भोगम, विलास पाटील, माजी सभापती ज्योती पाटील, दीपक पाटील आणि अशोक देसाई आदींची भेट घेवून संवाद साधला.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, मतदारांना भेटणं आपलं काम आहे, कुणा आमक्याचं तमक्याचं घर टाळण मला योग्य वाटत नाही. त्यामुळं मी सर्वांना नमस्कार करतो. शिरोळमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, भाजपचे राजवर्धन नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीचे प्रकाश पठाडे, भाजपाचे आमदार शिवाजी पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानपरिषद, जिल्हापरिषद निव़डणूक वेगळी आणि सहकाराची निवडणूक वेगळी आहे. सहकार क्षेत्रात विविध पक्षांच्या नेत्यांना भेटण्यात गैर काहीच नसल्याचं सांगत, जिल्ह्याच्या विकासासाठी राजकारणविरहित निर्णय घेण्याची गरज असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटलं.

यावेळी गोकुळच्या कारभारावरूनही आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. कोणताही एकटा नेता गोकुळचा मालक होऊ शकत नाही. दूध उत्पादक शेतकरी हाच गोकुळचा खरा मालक असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. दूध उत्पादक शेतकरी कष्ट करून दूध तयार करतात, तर महिला दूध उत्पादकही मोठ्या प्रमाणावर गोकुळला दूध पुरवतात. त्यामुळं गोकुळच्या कारभाराचा खरा केंद्रबिंदू दूध उत्पादकच असला पाहिजे. महायुतीमध्ये अनेक पक्ष असल्यानं नाराजी निर्माण होण्याची शक्यता असली तरी निवडणुकीतील संभाव्य समीकरणांबाबत सध्या कोणतंही वक्तव्य करणार नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम स्पष्ट झाल्यानंतर भूमिका मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्याला यापूर्वी उमेदवारी देताना झुकतं माप दिलं होतं. मात्र यावेळी तसं होणार नाही. मागील पाच वर्षांत गाई आणि म्हशीच्या दूध दरात प्रत्येकी दहा रुपयांची वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं. गोकुळचा कारभार राजकारणविरहित ठेवून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचं आश्वासन देत, आपल्या पॅनेलला बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन आ.सतेज पाटील यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी, म्हैस दुधाच्या बाबतीत चंदगड तालुका एक नंबर आहे आणि तो कायम एक नंबर राहील. आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून जे काय पॅनेल होईल, त्या पॅनलबरोबर चंदगड तालुक्यातील दूध उत्पादक आणि ठरावधारक ठामपणे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी, राजकारणात शेतकऱ्यांचं हित बघितलं पाहिजे. आ.सतेज पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. एखाद्या कामासाठी मी त्यांची मदत घेत असतो. असं सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

या दौऱ्यावेळी रामराजे कुपेकर, गोपाळराव पाटील, अंजना रेडेकर, अभिजीत तायशेटे, सत्यजित जाधव, विद्याधर गुरुबे, सचिन घोरपडे, राहुल देसाई, दयानंद रेडेकर, सचिन घोरपडे, विलास कांबळे, अशोक जाधव, एम. जे. पाटील, संभाजी देसाई, विक्रम चव्हाण -पाटील, नितीन पाटील, निंगाप्पा आवडण, मल्लिकार्जुन मुगोरी, शंकर ओउळकर, शिवाजी सावंत ,वसंत निकम, जगन्नाथ इंगवले, गोविंद पाटील यांच्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक विविध संस्थेचे संचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top