तब्बल चार वर्षानंतर धरणात 99.90 टक्के पाणीसाठा
कोल्हापूर – कोल्हापूरकरांची तहान भागवणारे आणि जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असणारे काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तब्बल चार वर्षानंतर आज बुधवारी सकाळी दहा वाजता काळम्मावाडी धरणात 99.90 टक्के पाणीसाठा झाला आहे.
काळम्मावाडी धरणाची पाणी साठवणूक क्षमता 646 मीटर आणि 25.39 टीएमसी इतकी आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता पाणी पातळी 645.98 मीटर आणि 25.36 टीएमसी झाल्याने धरण 99.90 टक्के भरले आहे. काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईन मार्फत उन्हाळ्यात अखंडित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. आंतरराज्य प्रकल्प असलेल्या काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीला लागलेल्या गळतीमुळे 2022 नंतर धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत नव्हता. मात्र यावर्षी गळती काम 50 टक्के पूर्ण झाल्याने जलसंपदा विभागाने धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसंचय करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे.



