कोल्हापूर – यशवंत सहकारी बँकेच्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर जोरदार चर्चा झाली. अध्यक्ष महेश पाटील यांनी बँकेच्या कामकाजाचा आढावा सादर करताना अहवाल सालात बँकेच्या ठेवी १८० कोटींवरून २०९ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले. सभेत सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पाटील यांनी विषयांचे वाचन केले. त्यानंतर सभेत विविध प्रश्नांवरून वादळी चर्चा झाली.
शेतकरी संघटनेचे बाजीराव देवाळकर यांनी, ठेवी वाढल्याबद्दल अभिनंदनाचा तसेच शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणारा ठराव मांडला. भीमराव नाळे यांनी संस्थात्मक ठेवी वाढल्या असताना वैयक्तिक ठेवी का वाढल्या नाहीत, असा सवाल केला. अॅडव्होकेट विजय पाटील यांनी ७१ कोटी रुपयांचे मार्जिन बँकेसाठी घातक असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०८७ सभासद वाढवणे धोकादायक असल्याचे मत व्यक्त करत ४७ कोटींची थकबाकी चिंताजनक असल्याचे सांगितले. विठ्ठल पाटील यांनी वाढता एनपीए आणि थकबाकीमुळे नफ्यावर परिणाम होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. सभेत नोकरभरतीचा मुद्दाही गाजला. प्रकाश देशमुख यांनी संचालक मंडळाने नातेवाइकांची भरती करू नये, असा ठराव मांडला.
उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची मागणीही त्यांनी केली. माजी संचालक आनंदराव पाटील यांनी, बँकेने चार नवीन शाखा काढून दाखवाव्यात, असे आव्हान दिले. ज्योत्सना पाटील यांनी तोट्यातील तीन शाखांचे स्थलांतर करण्याची मागणी केली. यावर संचालक अॅड प्रकाश देसाई यांनी संबंधित शाखा टप्प्याटप्प्याने नफ्यात येत असल्याचे स्पष्ट केले. बी. बी. पाटील, सुरेश रांगोळकर, बाबुराव कारंडे, संजय शेलार, पुंडलिक कांबळे आणि के. आर. पाटील, पंडित मस्कर, नामदेव यादव यांनी चर्चेत सहभाग घेतला. सभासदांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन अध्यक्ष महेश पाटील यांनी दिले आहे.


