तेरवाड येथील सूत गिरणीत भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

<p><strong>तेरवाड येथील सूत गिरणीत भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान</strong></p>

शिरोळ : शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील पार्वती सहकारी सूत गिरणीत बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गिरणीत अचानक ठिणगी पडून सूत व कापूस यांना आग लागली. गिरणीत मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य असल्यामुळे काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच कुरुंदवाड अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्यामुळे नियंत्रण मिळवण्यासाठी वेळ लागला. आगीत सूत, कापूस तसेच महागडी मशिनरी जळून खाक झाली असून गिरणीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेतली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.