कोल्हापूर – महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या नावाने कोल्हापूर शहरातील लोणार वसाहत, जिवबानाना पार्क, कनाननगर, राजेंद्रनगर झोपडपट्टी, ब्रह्मपुरी टेकडी अशा पाच ठिकाणी दुपारी २ ते ५ या वेळेत दवाखाने सुरू होते. यामुळे परिसरातील गरीब आणि गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळत होती. हे दवाखाने एका खासगी कंपनीमार्फत चालवले जात होते. मात्र नोव्हेंबरपासून हे दवाखाने बंद असल्याने गरजू रूग्णांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे तात्काळ हे दवाखाने सुरू करावेत अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत कार्यवाही झाली नाही तर ढोल बजाव आंदोलन करू, असा इशारा तालुकाध्यक्ष राजू यादव यांनी दिला आहे.
यावेळी मागणीचे निवेदन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस बी गायकवाड यांना सादर करण्यात आले. या प्रसंगी शहर प्रमुख विशाल देवकुळे, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, अवधूत साळुंखे, राजू सांगावकर, राहुल गिरोले , संदीप दळवी, हर्षल पाटील, दिपाली शिंदे, जितू कुबडे आदि उपस्थित होते.




