केंद्र स्तरावर गोकुळची दखल घेतल्याबद्दल आ. सतेज पाटील यांनी राहुल गांधींचे मानले आभार
नवी दिल्ली – गोकुळ दूध संघात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाची दखल आता केंद्र स्तरावर घेण्यात आली आहे. गोकुळच्या घडामोडीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून, गोकुळ दूध उत्पादकांच्या मतांचा अपहार असून, जनादेशात भेसळ झाल्याची टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी भाजपचा पराभव केला. मात्र, निवडणुकीनंतर नियम बदलून चार संचालकांची नियुक्ती करून १२ चे संख्याबळ १६ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा दूध उत्पादकांच्या मतांचा अपहार केला असून, जनादेशात भेसळ करण्याचा प्रकार आहे. सत्ता वाचविण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. दूध उत्पादकांची मते हिरावून घेणाऱ्यांना शेतकरी विसरणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.
काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनीही या निर्णयाला लोकशाही जनादेश बदलण्याचा प्रयत्न म्हटले आहे. १९ ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या. मात्र, अध्यक्ष निवडीच्या सभेला महायुतीचे संचालक अनुपस्थित राहिल्याने निवडणूक प्रक्रिया रखडली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबरला नव्याने अध्यक्ष निवडणूक घेण्याचे निर्देश दिले.
निवडून आलेल्या संचालक मंडळाला काम करू देण्याऐवजी राज्य मंत्रिमंडळाने चार मतदानाचा अधिकार असलेले शासननियुक्त संचालक आणि एका शासकीय अधिकाऱ्याच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे निवडणुकीतील संख्याबळाचे समीकरण बदलू शकते, असे पवन खेरा यांनी म्हटले आहे. निवडणुकीनंतर सरकार नियम बदलू शकते का, असा सवाल उपस्थित करत या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे..
यावर आ. सतेज पाटील यांनी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आभार मानत आम्ही न्यायालयीन लढाईबरोबर रस्त्यावरची लढाईही लढू असे म्हटले आहे.




