नवी दिल्ली – घरखरेदी करणाऱ्यांसाठी आज सर्वोच्च न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान महत्वाचे निर्देश नोंदवले आहे. ज्यामुळे घरखरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
“बँका आणि बिल्डर्स यांच्यातील कर्ज वितरण प्रक्रियेची तपासणी केल्यानंतर घरखरेदीदार स्पष्टपणे डिफॉल्टर असल्याचे आढळत नाही, तोपर्यंत सक्षम न्यायालय त्यांना हप्ते भरण्याबाबत कोणताही अंतरिम आदेश देऊ शकत नाही,” असे न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश सुर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हा निर्देश दिला आहे.
गुडगावमधील सोहना परिसरात ‘रहेजा डेव्हलपर्स लिमिटेड’ या खासगी बिल्डर-कम-डेव्हलपर कंपनीने राबवलेल्या ‘कृष्णा हाऊसिंग स्कीम’ प्रकल्पातील बाधित घरखरेदीदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांनी घेतलेल्या गृहकर्जासंदर्भात घरखरेदीदार, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि रहेजा डेव्हलपर्स यांच्यात एक त्रिपक्षीय करार झाला होता. या करारानुसार, बांधकामाच्या प्रगतीनुसार कर्जाचे हप्ते वितरित करणे अपेक्षित होते. मात्र, रहेजा डेव्हलपर्सने करारातील अटींचे पालन केले नाही आणि बांधकामात कोणतीही प्रगती नसतानाही एसबीआयने बिल्डरला कर्जाची रक्कम अदा केल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला होता. याविरोधात त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली.




