कोल्हापूर – कागल तालुक्यातील निढोरी गावाजवळ रविवारी दुपारी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीचे चाक निखळल्याने ट्रॉली पलटी झाली आहे. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र ट्रॉलीतील ऊस रस्त्यावर पसरल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरील ऊस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून सध्या गळीत हंगाम सुरू असल्याने अपघात रोखण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करणे गरजेचे आहे.




