कोल्हापूर – करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेजवळ प्रकाश अर्जुन चौगले या शेतकऱ्याची दोन एकर ऊस शेती आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला चौगले यांच्या मालकीच्या उसाच्या फडाला अचानक आग लागली. आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या टिंबर मार्केट स्थानकातील चालक सुरेश मर्दाने, फायरमन अजित शिणगारे, गणेश टीपुगडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र भर दुपारी उन्हाचा तडाखा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीमुळे काही वेळातच दोन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी आजबाजूला पाण्याचा फवारा मारल्याने शेजारी असणारे ऊस क्षेत्र मात्र या आगीपासून बचावले. दोन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाल्याने चौगले यांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.




