सहकार

सरकारच्या सहकारातील हस्तक्षेपाविरोधात देवाळे गावात महायुती सरकारच्या पुतळ्याचे दहन…

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर –  राज्य सरकारने पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये शासन नियुक्त सदस्य नेमण्याचा आणि त्यांना मताधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त होत असून देशपातळीवर देखील याची दखल घेण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तर महायुतीच्या कार्यकर्त्यांना देखील हा निर्णय आवडलेला नाही.

काल बानगे या गावात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त केला होता. आज करवीर तालुक्यातील देवाळे या गावात संतप्त कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला. यावेळी महायुती सरकारच्या हुकूमशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

 ज्या स्वर्गीय आनंदराव पाटील चूयेकरांनी सायकलवरून दूध गोळा करून अनेक खस्ता खात गोकुळ दूध संघाची स्थापना केली, त्यांच्याच मुलाला चेअरमन होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत तानाजी भोसले यांनी निषेध केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून सहकार कायद्यात बदल करून शासन नियुक्त सदस्य नेमून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय सहकारातील लोकशाही व्यवस्थेला बाधा आणणारा असून कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचा आरोप तानाजी भोसले यांनी केला आहे. गोकुळ हा दूध उत्पादकांच्या कष्टातून उभा राहिलेला संघ असून त्याच्या कारभारात शासनाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

या आंदोलनात  एम. आर. पाटील, रघुनाथ चव्हाण, युवराज पाटील, अरुण पाटील, संदीप गायकवाड, प्रदीप पाटील, दिनकर पाटील, रोहित पाटील, रंगराव साळोखे, प्रकाश पाटील, बंडोपंत पाटील, तानाजी पाटील, दीपक हुजरे, महादेव पाटील, कृष्णात साळोखे, पंडित पाटील, अशोक बेलेकर, दिलीप पाटील, कृष्णात पाटील, सुभाष पाटील, विठ्ठल पोवार, राम पाटील यांच्यासह सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित विषय

Scroll to Top