ज्यांना जनतेने नाकारलं ते तज्ञ कसे..? : आ. सतेज पाटील यांचा सवाल
कोल्हापूर – गोकुळ दुध संघात बहुमत मिळवण्यासाठी नवीन कायदा आणला जात आहे. निवडणुकीच्या आधी हा कायदा झाला असता तर मी मान्य केले असतं पण निवडणूक झाल्यानंतर हा कायदा येतोय म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी केलेला हा अट्टाहास आहे का ? असा सवाल करत पत्रकार परिषदेत आ. सतेज पाटील यांनी, सरकारच्या चार प्रतिनिधीच्या नियुक्तींचा निषेध केला. तांत्रिक मुद्दा उपस्थित करत आमचं बहुमत नाकारत आहेत. ज्यांना जनतेने नाकारलं ते तज्ज्ञ कसे?, ते तज्ज्ञ असते तर त्यांना लोकांनी निवडून दिलं असतं का ?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढच्या काळात जनता यांना जागा दाखवेल जनतेचा कौल ते नाकारत आहेत. कोल्हापूरकरांचा कौल नाकारण्याचे काम सध्या सुरू आहे. या पाठीमागे मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांतदादा पाटील यांचं षडयंत्र सुरू आहे. सरकारकडून कोल्हापूरकरांचा अपमान केला जात आहे त्यासाठी सोमवारी नऊ तारखेला दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संघर्ष मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कोल्हापूरकरांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.




