कोल्हापूर – गेल्या तीन दिवसांपासून पुणे – बेंगलोर महामार्गावर ऊस दरासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको केलं होतं. अखेर काल सायंकाळच्या दरम्यान मंत्री हसन मुश्रीम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तिसरी बैठक पार पडली. अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर ऊस दरावर तोडगा निघाल्याने शेतकऱ्यांनी किणी टोल नाक्यावरील आंदोलन मागे घेतले आहे.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी ऊस दराबाबत पत्र काढले आहे. हे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
या पत्रात म्हटले आहे कि, शेतकर्यांना ऊसाची पहिली उचल म्हणून ३,९०० रुपये दिले जातील. कारखाना गाळप हंगाम संपल्यानंतर अतिरिक्त १०० रुपये दिले जातील, ज्यामुळे एकूण रक्कम ४,००० रुपये होईल.
वर्षाभरात साखरेचा दर प्रति क्विंटल ४,५०० रुपयांपेक्षा जास्त राहिल्यास, शेतकर्यांना आणखी २०० रुपये अतिरिक्त उचल दिली जाईल. साखरेचा दर यापेक्षाही अधिक वाढल्यास, ठरलेल्या सूत्रानुसार (फॉर्म्युला) पुढील दर निश्चित केला जाईल, असे म्हटले आहे.
या बैठकीला माजी मंत्री प्रकाश आवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी स्वस्तिक पाटील, राजेंद्र गड्ड्यानवार, भगवान काटे, विभागीय साखर सहसंचालक उपस्थित होते.




