कोल्हापूर : ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेली बैठक अखेर निष्फळ ठरली. पहिली उचल ३ हजार ९०० रुपये की ४ हजार रुपये, या अवघ्या १०० रुपयांच्या फरकावरून बैठकीत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे ऊस दराची कोंडी कायम राहिली आहे.मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत पहिली उचल ३ हजार ९०० रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानंतर आणखी १०० रुपये देण्यात येतील, असे स्पष्ट केले. याशिवाय साखरेला जादा दर मिळाल्यास आणि बाजारातील दर स्थिर राहिल्यास आणखी २०० रुपये देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पहिली उचल ४ हजार रुपये मिळालीच पाहिजे, या मागणीवर ठाम भूमिका घेतली. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांनी मांडलेला प्रस्ताव आणि राजू शेट्टी यांची मागणी यामध्ये तडजोड होऊ शकली नाही. अखेर १०० रुपयांच्या फरकावरून बैठक निष्फळ ठरली.विशेष म्हणजे, या बैठकीत शेतकरी संघटनांची एकजूट पाहायला मिळाली. विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत राजू शेट्टी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. राजू शेट्टी जो निर्णय घेतील, त्या निर्णयाशी आम्ही ठाम राहू, अशी स्पष्ट भूमिका प्रा. जालिंदर पाटील यांनी मांडली. बैठक संपल्यानंतर शेतकरी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी कारखानदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.एकीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार रुपयांची पहिली उचल मिळावी, यासाठी शेतकरी संघटना ठाम आहेत, तर दुसरीकडे कारखानदारांशी चर्चा करून टप्प्याटप्प्याने अधिक रक्कम देण्याचा प्रस्ताव मंत्री मुश्रीफ यांनी मांडला आहे. उद्या कारखानदारांशी बोलून निर्णय घेण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे ऊस दराचा तिढा आणखी वाढण्याची चिन्हे असून, पुढील चर्चेत काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.




