‘गोकुळ’च्या खासगीकरणासाठी २०० कोटींची ऑफर? महादेव जानकरांचा गंभीर दावा; आमदार सतेज पाटलांचा विरोधकांवर निशाणा

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या खासगीकरणासाठी तब्बल २०० कोटी रुपयांची ऑफर दिली गेल्याचा माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलेला दावा सध्या कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या दाव्यावर विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे.

आमदार सतेज पाटील म्हणाले, “माजी दुग्धविकास मंत्र्यांनी केलेला दावा अत्यंत गंभीर असून महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट होण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही मोठा लढा दिला. त्यावेळी गोकुळ मल्टिस्टेट झाला असता, तर आज गोकुळच्या निवडणुका कधी झाल्या हे दूध उत्पादकांना कळलेसुद्धा नसते.”

तत्कालीन भाजप सरकारच्या काळातील दुग्धविकास मंत्र्यांकडे काही लोक गोकुळला मल्टिस्टेट करण्यासाठी देवाण-घेवाणीची चर्चा घेऊन गेले होते, असा दावाही सतेज पाटील यांनी केला. “गोकुळला आधी मल्टिस्टेट करायचे आणि त्यानंतर देशभरातील कोणाच्या तरी घशात घालायचे, असा मोठा डाव सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.

गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून दूध उत्पादकांच्या हिताशी आणि कोल्हापूरच्या अस्मितेशी संबंधित असल्याचे पाटील यांनी म्हटले. “ही केवळ निवडणूक नसून कोल्हापूरच्या अस्मितेची आणि सामान्य दूध उत्पादकांच्या हिताची लढाई आहे. दुग्धविकास मंत्र्यांनी स्वतः हा प्रकार जाहीरपणे उघड केला असल्याने या दाव्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

दरम्यान, गोकुळच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीच्या पॅनेलची रणनीती आणि जागावाटपाबाबतही राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचे प्रमुख नेते सोमवारी, ७ तारखेला दिल्लीत जाणार असून पक्षश्रेष्ठींसोबत महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे.

यावरही सतेज पाटील यांनी महायुतीवर खोचक टीका केली. “गोकुळच्या पॅनेलसाठी जागावाटपाचा निर्णय घेण्यासाठी आता महायुतीच्या प्रमुख नेत्यांना दिल्लीला जावे लागत आहे. पक्षश्रेष्ठींसोबत बैठक करून निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

गोकुळच्या खासगीकरणाचा मुद्दा, मल्टिस्टेटचा पूर्वीचा वाद आणि आगामी निवडणुकीसाठी सुरू असलेली राजकीय जुळवाजुळव यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ निवडणुकीची रंगत वाढली आहे.

Scroll to Top