प्रकाशक प्रशांत आंबींचे आ. संजय गायकवाडांना खुले आव्हान…

कोल्हापूर – शिवाजी कोण होता? पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी पाच साडे पाच महिन्यापूर्वी फोनवरून शिवीगाळ केली होती. त्याची ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली होती. नऊ मिनिटाच्या या क्लिपमध्ये आमदार गायकवाड यांनी आंबी यांना तब्बल ३६ शिव्या दिल्या होत्या. यानंतर दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा, यासाठी आंबी यांच्याकडून अनेकवेळा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांना बेदखल करण्यात आले तर दुसरीकडे आमदार गायकवाड यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे या पुस्तकाबाबत अकरा प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी प्रशांत आंबी यांनी पुस्तकाची अनधिकृत छपाई करुन कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप करत या अनुषंगाने चौकशी करून मालक मुद्रक प्रकाशक यांच्यावर कारवाई करून त्यांची सर्व मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी केली आहे.

याबद्दल दोन दिवसांपूर्वी राजारामपुरी पोलिसांनी प्रशांत आंबी यांना बोलावून चौकशी केली. या संदर्भात आज प्रशांत आंबी यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस आपल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप केला. माझ्याकडे करोडो रुपयांची संपत्ती असेल तर सर्व संपत्ती आमदार गायकवाड यांच्या नावावर करायला तयार आहे असे खुले आव्हान आंबी यांनी दिले आहे. याबद्दल माहिती देताना आंबी यांनी पोलीसांकडून जी चौकशी सुरु आहे. त्याला सहकार्य करणार नाही अशी भूमिका घेत यासंदर्भात वकील असीम सरोदे कायदेशीर उत्तर देतील असे स्पष्ट केले आहे.

याआधी आमदार गायकवाड यांनी आंबी यांना पाकिस्तान आणि चीन फंडिंग करतंय, असा आरोप केला होता. मात्र नंतर त्यांनी हा आरोप मागे घेतला. आता त्यांनी आंबी यांना कोण जिहादी मदत करतोय का? असा प्रश्न उपस्थित केलाय जर आमदार गायकवाड यांना पुस्तक प्रकाशित करणारे जिहादी वाटत असतील तर भारतातील सर्व जिहादींनी आपल्याला मदत करावी, असे आवाहन आंबी यांनी केले.

आई यल्लव्वा आंबी जोगवा मागून पोट भरते, बहीण रुक्मिणी कोळी इतरांची धुणीभांडी करून संसार चालवते आणि आम्ही पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून तुटपुंजी मिळकतीवर घर चालवत असल्याची माहिती आंबी यांनी दिली. आमदार गायकवाड यांचा कोट्यवधींचा आरोप म्हणजे गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

या पत्रकार परिषदेला आरती आंबी, यल्लव्वा आंबी, रुक्मिणी कोळी, राजवैभव रामचंद्र, हरीश कांबळे आदी उपस्थित होते.

Scroll to Top