कोल्हापूर – दूधगंगा, वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने यंदा दहा लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून बिद्री साखर कारखाना यावर्षीही दरात सर्वात पुढे राहिल, असा विश्वास अध्यक्ष के पी पाटील यांनी व्यक्त केला. कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा, वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के पी पाटील यांनी, साखर कारखानदारीतील अनंत अडचणीमुळे साखर उद्योग अडचणीत आल्याचे सांगितले. उसाला अधिकचा दर मिळण्यासाठी केवळ एफ.आर.पी. वाढून उपयोग नाही, तर त्यासोबतच साखर विक्रीचा दर, सहवीज प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेला दर आणि इथेनॉलचा दर यामध्ये वाढ झाली पाहिजे, असे सांगितले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजीत १० मीटर एअर रायफल प्रकारात सोनम उत्तम मस्कर हिने रौप्य पदक पटकावले. या यशाबद्दल कारखान्याच्यावतीने अध्यक्ष के. पी. पाटील यांनी तिला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. यावेळी त्यांनी सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. आयत्या वेळच्या विषयांसह आठही विषयांना सभासदांनी मंजूरी दिली. दरम्यान, ऊस दर प्रश्नावरुन दरवर्षी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखाना यांच्यात खडाजंगी ठरलेली असते, परंतु यावर्षीच्या सभेत संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनी अध्यक्ष के पी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने सभासदांना चांगला ऊस दर दिल्याचे सांगून त्यांचे कौतूक करत अभिनंदन केले.
यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, यांच्यासह कारखान्याचे सभासद उपस्थित होते.




