कोल्हापूर – शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या चंदगडमधील सुशीला जाधव, राम कांबळे आणि पाचगावातील प्रकाश गावडे यांचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महिलांच्या गळ्यातील दागिने आणि प्रवाशांच्या खिशातील रोकड चोरी करणाऱ्या प्रकाश विजय जाधव याला शिये परिसरातून अटक केली आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे मणीमंगळसूत्र आणि सोन्याची चेन असा सहा लाख तीन हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार राजू कोरे, रोहित मर्दाने, समीर कांबळे, सतीश जंगम, शुभम संकपाळ, योगेश गोसावी, अमित सर्जे, युवराज पाटील, संजय हुंबे, अरुण धनगर अमित मर्दाने यांनी या कारवाईत सहभाग घेतला.




