पन्हाळगडावर ‘असा’ साजरा झाला अभियंता दिन…

कोल्हापूर – रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या मार्गदर्शनाखाली रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसर अर्थात आरसीसी ही सामाजिक संस्था वारणा परिसरात गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत आहे. आरसीसीच्यावतीने दरवर्षी १५ सप्टेंबर अभियंता दिनाचे औचित्य साधून वारणा परिसरातील अभियंत्यांचा सन्मान केला जातो. यावर्षी पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पन्हाळगडावर हेरिटेज वॉकचे आयोजन करत अनोख्या पध्दतीने अभियंता दिन साजरा करण्यात आला.

पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा जयश्री पोवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे ओएसडी गणेश मेळावणे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे प्रेसिडेंट रोटेरियन योगेश रास्ते, सेक्रेटरी रोटेरियन विजय कुलकर्णी, रोटरी ग्रामसेवा केंद्राचे मार्गदर्शक युवा उद्योजक विशाल जाधव, शाहीर विशारद आझाद नायकवडी, रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरचे प्रेसिडेंट डॉ. शामप्रसाद पावसे, सेक्रेटरी प्रा. धनंजय गिरी, ट्रेझरर इंजिनियर प्रवीण कावळे, प्रोजेक्ट चेअरमन इंजिनियर शिवाजी सुतार, तेजल जाधव, ज्योत्सना मेळावणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता रुपाली पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत चार दरवाजा परिसरात हेरिटेज वॉकचा शुभारंभ करण्यात आला.

 यावेळी युवा उद्योजक विशाल जाधव यांनी, रोटरी ग्रामसेवा केंद्राने पन्हाळगडाच्या संवर्धनाचा उपक्रम हाती घेण्याचे ठरवले असून हेरिटेज वॉक त्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची नांदी असल्याचे सांगितले. महसूलमंत्र्यांचे ओएसडी गणेश मेळावणे यांनी, रोटरी ग्रामसेवाच्या हेरिटेज वॉक उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात ग्रामसेवा केंद्राला शासनाचे सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली.

नगराध्यक्षा जयश्री पोवार, गणेश मेळावणे यांनी, आरसीसीच्या हेरिटेज वॉक या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. या वॉकच्या माध्यमातून प्रातत्व अभ्यासक सचिन पाटील यांनी, चार दरवाजा, नागझरी, तीन दरवाजा, अंधारबाव, धान्य कोठार या पन्हाळगडावरील वास्तू आणि ठिकाणांची पुरातत्वीय, ऐतिहासिक माहिती दिली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर पन्हाळगडावरील राजवटी, त्या राजवटींमध्ये गडावर झालेल्या बांधकामांची वैशिष्ट्यं, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रजाहितदक्ष कारभार, त्यांची युध्दनिती, पन्हाळगडाचे भौगौलिक स्थान त्यांचे मराठ्यांच्या इतिहासातील स्थान, सध्या पन्हाळगडाचा वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये झालेला सहभाग या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती देताना काळानुरुप इतिहासामध्ये नवनवीन गोष्टींची भर पडत असल्याचे सांगितले.

पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील यांनी, आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून पन्हाळगडाच्या इतिहासातील अनेक अपरिचित गोष्टींची माहिती दिली तर शाहीर आझाद नायकवडी यांनी या वॉक दरम्यान आपल्या शाहीरीतून शिवकाळ उभा केला.

हेरिटेज वॉक ने दिली गड संवर्धनाची प्रेरणा

हेरिटेज वॉक दरम्यान पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील यांनी, रोटरी ग्रामसेवा केंद्राने नागझरी परिसराची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत रोटरी ग्रामसेवा केंद्राने महिन्यातील एका रविवारी नागझरीसह अन्य ठिकाणी श्रमदान करून गड संवर्धनासाठी हातभार लावण्याचा निर्धार केला.

या हेरिटेज वॉक मध्ये वारणा कोडोली परिसरातील अभियंता, रोटरी ग्रामसेवा केंद्राचे पदाधिकारी, सदस्य, त्यांचे कुटुंबिय, बी. के. इंटरनॅशनल, बचपन स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी प्रेसीडेंट जयदीप पाटील, संदीप रोकडे, प्रकाश सूर्यवंशी, सचिन पाटील, प्रवीण बजागे, माजी सेक्रेटरी सुनील पोवार, विशाल बुगले, उत्तम पाटील, सदस्य भरत कडवेकर, डॉ. सतीश पाटील, पराग गोडबोले, ज्योती देशमुख, डॉ. वैशाली पावसे, अर्चना पाटील, अर्चना रोकडे, ज्योती पोवार, डॉ.प्रियांका कडवेकर आदींनी परिश्रम घेतले.

Scroll to Top