मुंबई – एसटीचा प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना एनसीएमसी (NCMC) कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु कार्ड काढताना अनेक अडचणी येत असल्याने तसेच अनेक नागरिकांनी अद्याप कार्ड न काढल्याने कार्ड योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पूर्वी १ सप्टेंबर ही शेवटची मुदत होती ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्यांचे एनसीएमसी कार्ड आधीच सक्रिय झाले आहे, त्यांनी कार्डद्वारेच सवलतीचा लाभ घ्यावा, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.
एसटी महामंडळाने परिपत्रकात म्हटले आहे कि, एनसीएमसी कार्डच्या कार्यप्रणालीच्या सर्व्हरवर वाढलेल्या ‘हिट्स’मुळे कार्डद्वारे सवलतीचे तिकीट देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत यापूर्वीच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार सवलतीचे तिकीट देण्याच्या सूचना सर्व आगारांना देण्यात आल्या आहेत. कार्ड रीड न होणे किंवा अन्य तांत्रिक अडचणीमुळे कार्डद्वारे तिकीट देणे शक्य होत नसल्यास पूर्वीच्या पद्धतीने सवलतीचे तिकीट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.




