कोल्हापूर – विरोधकांच्या मांडीला मांडी लावून पापाचा धनी व्हायचे नाही, आम्हाला गोकुळ दूध संघ हा जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांचा ठेवायचा आहे, तो टिकवायचा आहे. यासाठी समविचारी लोकांना एकत्र करत आम्ही आघाडी उभी केली आहे. गडहिंग्लजच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे. गडहिंग्लज तालुक्यातील ठराव धारकांच्या गाठीभेटीवेळी ते बोलत होते.
गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी, दूध उत्पादक आणि ठरावधारकांची आ. सतेज पाटील यांनी भेटी घेतली. या दरम्यान त्यांनी संग्राम कुपेकर, प्रकाश गाताडे, प्रकाश चव्हाण, स्वाती कोरी, प्रकाश पाटील, संजय बटकडली, अॅड. बाळासाहेब पाटील, बाळेश नाईक, रविंद्र धरणगुत्ते याची भेट घेतली. तसेच लिंगनूर येथील अशोक नागू कुरळे या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठा प्रकल्पाला भेट दिली.
ठराव धारकांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील यांनी, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा पाया गोकुळसारख्या सहकारी संस्थांनी घातला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी ताठ मानेने उभा आहे. गोकुळची निवडणूक बंटी पाटील म्हणून महत्त्वाची नाही तर साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. गोकुळची सत्ता मिळवून मला कुणाला काही दाखवायचे नाही तर ताकतीने निवडणूक लढवून साडेपाच लाख लोकांच्या संसाराला ताकद द्यायचे आहे.विरोधकांच्या मांडीला मांडी लावून पापाचा धनी व्हायचे नाही. उसाचे पैसे वर्षातून मिळतात. पगार महिन्याला मिळतो तर दुधाचे पैसे दहा दिवसाला मिळते म्हणजे दूध व्यवसाय ग्रामीण जनतेला आर्थिक बळकटी देणारी आहे. आम्ही गेल्या पाच वर्षात काटकसर करून गोकुळ दूध संघामध्ये शेतकऱ्याला १४ रुपये दर वाढ देऊ शकलो. प्रति एक रुपये मधील ८५.७० टक्के पैसे आम्ही आता परत करतो. पुढील काळात एक रुपये मध्ये ९०पैसे परत देण्यासंदर्भात योग्य नियोजन करू तसेच आमचे पॅनल हे एकनिष्ठ, शेतकऱ्याचे, दूध उत्पादकचे, गरिबांचे आहेत. त्यामुळे आम्हाला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजना रेडेकर यांनी, जिल्ह्याचे अभ्यासू नेतृत्व असल्याने त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व संचालक ठामपणे उभे राहण्याचे काम करत आहोत. शेतकऱ्यांनीही त्यांचे काम करण्यासाठी आम्हाला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. रामराजे कुपेकर यांनी बोलताना सांगितले की, आ. सतेज पाटील हे आगळेवेगळे नेतृत्व आहे. त्याच्या घरातील कोणीही उमेदवार नसताना ते सामान्य कार्यकर्त्यांसाठी काम करतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी संग्रामसिंह नलावडे, रणजितसिंह पाटील, राहूल देसाई,विद्याधर गुरबे, दिग्विजय कुराडे, गणपतराव डोंगरे, पुंडलिक झुरे, प्रशांत देसाई, रामदास पाटील, नागराज जाधव, शिवाजी सावंत, अजित बंदी, किरण पाटील, बसवराज चराटी, शेखर पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



