छत्रपती संभाजीनगर – मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी गेल्या कितेक दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. तरी त्यांना हवा तसा प्रतिसाद राज्य सरकारकडून मिळत नसल्याने जरांगेंनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी, मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्या तर ठीक अन्यथा सरकारची मस्ती उतरवू, असा इशारा दिला आहे.
तीन वर्षापासून नुसते आश्वासन देत आहेत. २८ ऑगस्टपर्यंत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी, सरकारने गैरसमजातून बाहेर यावे. या लढ्यात मराठे जिंकतील किंवा मी उपोषण करुन मरेन, असा इशाराही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. माझे ओबीसी नेत्यांना आवाहन आहे. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. मराठ्यांच्या नादाला लागून तुमचं राजकीय करीअर उद्ध्वस्त करू नका. तुम्ही मंत्री आमदार झाल्यानंतर मराठयांच्या विरोधात काम करता. तुम्ही मराठा कुणबीच्या नादाला लागू नका, असेही त्यांनी म्हटले आहे.




