कोल्हापूर – करवीर तालुक्यातील उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच सारिका माने यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पदाच्या निवडीसाठी सरपंच उत्तम आंबवडे यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेत उपसरपंच पदासाठी बुलगानीन कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच उत्तम आंबवडे यांनी जाहीर केले.
मावळत्या उपसरपंच सारिका माने यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना सरपंच आंबवडे यांनी, मावळत्या उपसरपंच सारिका माने यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगले काम करून दाखवल्याचे सांगितले. नूतन उपसरपंच कांबळे यांना प्रशासकीय कामातील असलेल्या अनुभवाचा ग्रामपंचायतीला फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नूतन उपसरपंच बुलगानीन कांबळे यांनी, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत गावाचा विकास करून दाखवू, अशी ग्वाही दिली.
निवडीनंतर नूतन उपसरपंच बुलगानीन कांबळे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी करवीर पंचायत समितीच्या सदस्या डॉ. शिल्पा हजारे, ग्रामपंचायत सदस्य चंदा माने, मेघा गुमाने, भाग्यश्री पारखे, सोनाली मजगे, प्रतिभा पोवार, सुचिता सूर्यवंशी, प्रकाश पाटील, संदीप माने, ग्रामपंचायत अधिकारी महेश खाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.




