कोल्हापूर – देशात आणि राज्यात सध्या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना अचानकपणे साखरेच्या दरात तेजी आली आहे. अवघ्या ३ महिन्यांत साखरेच्या किमती तब्बल ४० टकक्यांनी वाढल्याने किरकोळ बाजारात साखरेने ८० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे. मात्र वाढलेल्या साखरेच्या दरावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शंका व्यक्त केली आहे.
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाढलेल्या दरामुळे हे पैसे शेतकऱ्यांना नाहीतर व्यापाऱ्यांच्या घशात जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दिवाळीपर्यंत पुरेल इतका साखरेचा साठा यंदाच्या हंगामातील आहे आणि पुढील उत्पादन देखील देशाला पुरेल इतके असताना अचानक दर कसे काय वाढले? असा प्रश्न शेट्टी यांनी केला आहे. साखरेच्या आत्ताच्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना दुसरा हप्ता प्रति टन पाचशे रुपये देणे शक्य होईल, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. दरम्यान, शेट्टी यांनी साखर कारखानदारांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. कारखानदारांनी आधीच साखर विकल्याचा दावा केला तरी उतारा चोरून अनधिकृतरित्या ठेवलेली साखर आता वाढलेल्या दरात विक्रीसाठी बाहेर काढली जाऊ शकते, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. त्यामुळे सरकारने साखर कारखान्यांच्या गोडाऊनमधून बाहेर पडणाऱ्या साखरेवर विशेष लक्ष ठेवावे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.




